रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही संस्था गेली चार दशके कार्यरत आहे. सामाजिक समस्यांचे व उपलब्ध पर्यायांचे सखोल अध्ययन, सहभागी घटकांचा समन्वय व त्यांचे योग्य प्रशिक्षण आणि यांद्वारे समस्या निराकरणाचा विधायक प्रयत्न हे प्रबोधिनीच्या कामाचे स्वरूप आहे. आणि याच कामाचा एक भाग असलेले ‘प्रबोधन वाचन-माला’ हे अभियान रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने सुरू केले आहे.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे असणारा विद्यार्थ्यांचा वाढता कल व त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांची रोडावत जाणारी संख्या हा विषय नवा नाही. अनेक व्यासपीठांवर तो वारंवार मांडला जातो, त्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते व सरकारने मराठी शाळा वाचवण्यासाठी काहीतरी करावे असा आग्रहही धरला जातो. त्यात वावगे काही नाही पण हा प्रश्न केवळ मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यापुरता मर्यादित नाही. शिक्षणाचे माध्यम कोणतेही असले तरी मातृभाषेतील साहित्याचे वाचन, जी भाषा आपण बोलतो त्या भाषेतील सकस आणि प्रगल्भ लिखाणाचे आकलन हे कायम सुरू राहिले पाहिजे. व्यक्तित्व आणि पर्यायाने आयुष्य समृद्ध करणारी ती गोष्ट आहे. आजचे वास्तव मात्र नेमके विपरीत आहे. शालेय किंवा तरुण विद्यार्थ्यांच्या पिढीमध्ये मराठी वाचनाच्या आवडीचा आणि प्रमाणाचा आलेख सतत खाली घसरत चालला आहे. सुजाण पालक, शिक्षक, संस्थाचालक, ग्रंथालये, प्रकाशक हे या वास्तवाचे नजिकचे साक्षीदार आहेत. कोणत्या माध्यमातून शिक्षण घ्यायचे हे ठरवण्याचा पूर्ण हक्क विद्यार्थ्याला किंवा त्याच्यावतीने त्याच्या पालकांना आहे. आपण सर्वांनी मिळून मराठी माध्यमाच्या शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक दर्जेदार करण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा पण त्याला समांतर असे पर्यायही शोधायला हवेत.

अभ्यासक्रम शिकण्याची भाषा कोणतीही असो पण मराठी वाचनाची आवड शालेय विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे जोपासली जाऊ शकते. संस्थाचालक, शिक्षक, पालक, स्थानिक ग्रंथालये, लेखक, साहित्यिक, प्रकाशक, पुस्तक विक्रेते आणि या सर्व घटकांना एकमेकांशी जोडून वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी झटणारे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन काही योजना ठरवली तर विद्यार्थ्यांमधील ‘प्रबोधन वाचन-माला’ ही लोक चळवळ बनू शकते !

शालेय वयात निर्माण होणारी साहित्य वाचनाची सवय मुलांच्या व्यक्तिमत्त्वात महत्वाची भर घालते. मातृभाषेतील साहित्य हे तर थेट त्यांच्या अवती-भवतीच्या जगाचेच चित्रण असते. अभ्यासक्रमाचा भाग नसला तरी आपल्या मातृभाषेतील साहित्य वाचून मुलांचे अनुभवविश्व नक्कीच समृद्ध होते. मराठी मातृभाषा असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रबोधन वाचन-माला हे राज्यस्तरीय अभियान सुरु करीत आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून सुरू होणाऱ्या या अभियानात शाळांमधील मुलांशी संवाद साधला जाणार आहे. पालकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. पुढील पिढीत वाचनाची आवड निर्माण करणे हा केवळ भाषणाचा नव्हे तर थेट कृतीचा भाग झाला पाहिजे. याच उद्देशाने आम्ही सर्व सबंधित घटकांना एकत्र आणणारे एक व्यासपीठ प्रबोधन वाचन- मालेद्वारे उपलब्ध करून देत आहोत.